Pune : ‘येवले अमृततुल्य’कडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज –  करोना विषाणूने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला असला तरी करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवले अमृततुल्य यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे या मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, गणेश येवले, निलेश येवले, मंगेश येवले, तेजस येवले तसेच संजय येवले, निलेश मोरे उपस्थित होते.

तसेच येवले अमृततुल्य संचलित ‘येवले फाऊंडेशन’या सामाजिक संस्थेद्वारे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आस्करवाडी व भिवरी या ठिकाणी 2000 मास्क व सॅनिटाईझरचे वाटप केले गेले. या विषाणूपासून‌ बचाव करणाऱ्या साधनांचा तुटवडा जाणवत आहे.  येवले फांऊडेशनच्या वतीने पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी व भिवरी या संपुर्ण गावकरी, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना मास्क तसेच सॅनिटायझरचे मोफत वाटप केले गेले.

तसेच संपुर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्तीत लढणाऱ्या या सर्व मंडळींना येवले अमृततुल्य मोफत  चहा देण्याचे काम सुरू आहे. मनानं आणि शरीरानं थकलेल्या या जीवांना तेवढीच तरतरी यावी आणि त्यांच्या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, एवढाच यामागे उद्देश असल्याचे येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.