Pune : ‘लॉकडाऊन’ काळात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यात ‘लॉकडाऊन’च्या काळात ग्राहकांना लुटणाऱ्या पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यात तीन किराणा दुकानदार, एक मेडिकल, एक गॅस एजन्सी यांचा समावेश आहे. सर्वजण जीवनावश्यक वस्तूची चढ्या दराने विक्री करत होते. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. अजूनही छापासत्र सुरू असून कारवाईत वाढ होणार आहे.

बाणेरला पुनाजी चौधरी हा दुकानदार पंचरत्न सुपर मार्केटमध्ये चढ्या दराने धान्य विक्री करत होता. शेंगदाणे 180 रुपये किलो, तूरडाळ 160 रुपये, मुगडाळ 155 रुपये, चणाडाळ 140 रुपये, किलो खोबरं 280 रुपये किलो, शाबूदाणा 135 रुपये किलो आणि साखर 48 रुपये किलो दराने विकत होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर, खडकी बाजारला गौरव अग्रवाल हा बीएम अग्रवाल किराणा जनरल स्टोअर या दुकानात शेंगदाणे 140 रुपये किलो गोटा खोबरे दोनशे वीस रुपये किलो या भावाने विकत होता. त्यामुळे या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर होम लिंक इंटरप्राईजेसचा मालक भूपेश गुप्ता आणि रोहन शुक्ला यांच्यावरही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चार लाख 30 हजार रुपयाचे 70 हजार 805 मास्क जप्त केले. त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टिळक रोडला अग्रज फुड प्रोसेसर या दुकानावर छापा टाकला. दुकानाचे मालक बाळकृष्ण थत्ते हे हे वाढीव दराने विक्री करत असल्याचे आढळून आले. तर चंदननगर परिसरात वडगाव शेरीला 796 रुपयाचा घरगुती गॅस सिलेंडर 1000 रुपये चढ्या दराने विक्री करत होता. याप्रकरणी अमित गॅस एजन्सीचा मालक अमित गोयलवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून तेहतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.