Nagpur : औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

एमपीसी न्यूज –  लॉकडाऊनमुळे राज्यातील  सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार किंवा मागणी आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. 

लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी  केली होती. ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री राऊत यांनी हा निर्णय घेतला आहे. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे महिन्यात एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.

लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्री म्हणाले, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्टर, पीएफ सारखे सर्व प्रोत्साहन, सवलती उपलब्ध असतील. तसेच मार्च महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचा भरणा 15 मे असणार आहे. तर एप्रिल महिन्याच्या वीजवापराच्या बिल 31 मे पर्यंत देयक राहणार आहे. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहणार असून  ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले आहे, त्या ग्राहकांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.