Pune : परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला ‘रमझान ईद’ चा गोडवा

1200 विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे, अत्तर आणि मिठाईचे वाटप

एमपीसी न्यूज- दूरदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. 4) सकाळी एकत्रितपणे रमझान ईदचा गोडवा अनुभवला ! डॉ पी ए इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन 1200 विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली. यात विद्यार्थीनींचाही समावेश होता.

आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात. तिकडे चंद्रदर्शन मंगळवारी झाल्याने पुण्यातही परदेशी विद्यार्थ्यांनी मंगळवारीच ईद साजरी केली.

आझम कॅम्पस मध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले आणि प्रेमाने मिठाई देण्यात आली. रमजानचे महिनाभराचे उपवास सोडण्याचा सोहळा म्हणजे रमझान ईद (ईद -उल -फित्र )! त्यानिमित्त सकाळी आझम कॅम्पसमधील मशिदीत या पुणेस्थित परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमाजपठण केले . एकमेकांची गळाभेट घेतली. रमझान ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि एकमेकांची वास्तपुस्त केली. त्याचप्रमाणे पुण्यात एकत्रित ईद साजरी करायला मिळाल्याची आनंदवार्ता आपल्या कुटुंबियांना परदेशात सोशल मीडियावरून लगेच कळवली !

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार, आझम कॅम्पसचे विश्वस्त, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते.

“रमझान ईद हा आनंदसोहळा असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले. घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते. एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते. पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे” असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like