Pune : संकटकाळात मतभेद विसरून पुणेकरांवर मायेची फुंकर घाला- आबा बागुल

एमपीसी न्यूज – मागील ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक संकटे आली. परंतु, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी एकजुटीने कोणतेही राजकारण न करता त्याला सामोरे जाऊन त्या संकटाना परतावून लावत होते. आता त्याच प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हद्दपार करू, असे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी केले आहे.

भाजपाच्यावतीने आज राज्यासह पुणे शहरात काळ्या फिती लावून राज्यसरकारचा निषेध केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोनाचे संकट गंभीर बनल्याचा अआरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना बागुल यांनी मतभेद विसरू कोरोनवर मात करण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला.

बागुल म्हणाले,  १९९२ ला खिलारीचा भूकंपावेळी पुण्यातून सर्व पक्षीय नेते मदतीला धावून गेले होते. पुणे शहरात डेंगू , चिकुन गुनिया, सार्स या सारख्या संकटाला एकत्र सामोरे गेले. मी विरोधी पक्षनेता असताना स्वाईन फ्लू सारख्या अतिशय घाबरून टाकणारा आजार आला होता.  त्यावेळी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनी एकत्र काम करून स्वाईन फ्लूवर मात केली होती. स्वाईनफ्लू आला कधी गेला कधी पुणेकरांना त्याची चाहूलही लागू दिली नव्हती.

परंतु, कोरोना राजकारणात अडकला की काय असे वाटू लागले असून आपल्यातली माणुसकी लोप पावत आहे असे झाले आहे. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा ‘एक मेका  साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या ओवी प्रमाणे  सर्वानी एकत्र येऊन यावर उपाय योजना शोधून कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोरोनामुळे संपूर्ण जगावरच मोठे संकट आले असून केंद्र व राज्य सरकार योग्य त्या उपाय योजना करत आहेत.  त्या मध्ये यशस्वीही होताना दिसत आहेत.  इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना आटोक्यात असून भारत लवकरच त्यावर मात करेल, असा विश्वास  बागुल यांनी व्यक्त केला.

पुणेकर नागरिकांना कोरोनातून बाहेर काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेची सर्व यंत्रणा रात्रंदिवस हातावर प्राण घेऊन काम करत आहे.  त्यांच्या कार्याला पुणेकरांच्या वतीने सलाम करतो. पुण्यावर आधीच संकटाचे काळे ढग आले असताना इतर काळ्या गोष्टी दाखवण्यापेक्षा सर्व पक्षीय लोक प्रतिनिधींनी एकत्र येऊन या संकटावर कशी मात करता येईल, हे पाहावे, असा टोलाही बागुल यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

पुणे शहरात उल्हास पवार,  अंकुश काकडे,  विजय काळे, शांतीलाल सुरतवाला, मोहन जोशी, श्रीकांत शिरोळे, अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई व आबा बागुल यांसारखी अनुभवी मंडळी सर्वच पक्षात आहेत अशा वेळी त्यांच्या कडून सल्ला घेऊन प्रशासन सोबत चर्चा करून  मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे,  असेही बागुल यांनी सांगितले.

कोरोनापुढे पुणेकर आता त्रासले, ग्रासले आहेत.   अशा वेळी त्यांना मायेची गरज आहे त्यांना मायेची फुंकर घालणे गरजेचे आहे. राजकारण आपण नेहमीच करतो ते राजकारणी करतातच परंतु ज्यावेळी एखादे संकट आपल्या देशावर, राज्यावर किंवा शहरावर येते तेंव्हा सर्वानी मिळून काम करायचे असते. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व राजकारण बाजूला ठेऊन प्रयत्न करू, असेही बागुल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.