Pune : वाढीव वीजबिल तातडीने माफ करा : मनसेची राज्य सरकारकडे मागणी

Forgive the increased electricity bill immediately: MNS's demand to the state government

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन महिने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती. आता मोठ्या प्रमाणात वीजबिल आकारण्यात येत आहेत, त्यामुळे ही वीज बिले आहेत की खंडण्या आहेत, असा सवाल मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. वाढीव वीजबिल तातडीने माफ करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.

याबाबत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांना निवेदन पाठविले आहे.

लॉकडाऊन शिथिल करून १५ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे सगळीकडे पैसेच पैसे झाले असल्याचा समज होऊन वीज बिल यायला सुरवात झाली आहे. ही बिले डोळे पांढरी करणारी आहेत.

अत्यंत चुकीच्या पद्धतीने वीज बिल आकारणी करण्यात आली आहे. ही वीज बिले पाहून एखादा सर्वसामान्य नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडेल इतकी भरमसाठ हे बिल आहेत, असा आरोप मनसेने केला आहे.

सर्वसामान्य जनता सध्या तरी जगावे कसे, या विवंचनेत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्यांच्या आहेत त्यांचे पगार कमी झाले आहेत. पगार मिळाले तर ते कापून मिळत आहेत, व्यावसायिकाचे प्रश्न तर अधिक गंभीर आहेत.

अनेक व्यवसाय बुडाले आणि नव्याने काही केलं तर अपेक्षित उत्पन्न नाही, अशी परिस्थिती आहे.

अजूनही शहरातील वेगवेगळे भाग लॉकडाऊन केले जात आहेत. चालू आस्थापने, दुकाने बंद केली जात आहेत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यातून आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

अशी परिस्थिती असताना हजारो रुपयाची बिल नागरिक कशी भरणार?. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांची वीज बिल सरकारने त्वरित माफ केली पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.