Pune : विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. आर. पी. जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य आणि पुणे विद्यार्थीगृहाच्या मुक्तांगण इंग्लिश स्कुलचे माजी प्राचार्य डॉ. रंगनाथ पांडुरंग जोशी उर्फ आर. पी. जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर या छोट्या गावातून शिक्षणाकरिता ते पुण्यात आले. पुणे विद्यार्थी गृहाच्या अनाथ वसतिगृहात राहून अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरेट मिळवल्यानंतर संस्थेच्या कार्यात त्यांनी माजी विद्यार्थी, पदाधिकारी म्हणून झोकून देऊन काम केले. संचालक मंडळाचे सदस्य, कार्याध्यक्ष म्हणून संस्थेच्या प्रगतीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

_MPC_DIR_MPU_II

मुक्तांगण इंग्लिश स्कुलचे प्राचार्य म्हणून काम करताना शाळेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय त्यांनी पुण्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने, तसेच इतर नामवंत संस्थांच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या मनमिळावू आणि मृदू स्वभावाने पुणे विद्यार्थी गृहाशी अनेक देणगीदारांना, नामवंत व्यक्तींना, माजी विद्यार्थ्यांना जोडले.

दरम्यान, संस्थेच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच संस्थेचे कामकाज एक दिवसासाठी (शनिवारी) बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.