Pune News : माजी महापौर अंकुश काकडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 1982 सालचा ‘तो’ किस्सा….

एमपीसी न्यूज – पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी 1982 सालचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी शरद पवार यांच्यामुळे त्यांना बजाज कंपनीची स्कुटर कशी मिळाली, याबद्दल आठवण सांगितली आहे. लुना पासून ते अगदी महापौर, जिल्हा बँक, म्हाडाच्या आलिशान गाड्यांपर्यंतचा प्रवास सांगताना ‘मला पवार साहेबांमुळे गाडी मिळाली’ असेही काकडे यांनी आवर्जून म्हटले आहे.

अंकुश काकडे यांनी शेअर केलेल्या आठवणीत म्हटले आहे, – ‘1982 साली बजाज वेस्पा स्कूटर मिळण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी लागत असे. मी एकदा लूनावरून जात असताना पाठीमागून शरद पवार आणि विठ्ठल मणियार हे शांतीलाल मुथा यांच्या गाडीतून जात होते. साहेबांनी मला पाहिले आणि विठ्ठल मनियार यांना विचारले, ‘अरे हा अंकुश आहे का ? विठ्ठल मणियार ‘हो’ म्हणाले. त्यानंतर आठ दिवसांमध्ये बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीचे कार्यकारी संचालक राहुलकुमार बजाज यांचे मला पत्र आले. पत्रातला मजकूर असा, ‘ शरद पवार यांच्या विनंतीनुसार मी माझ्या खास कोट्यातून आपणास बजाज सुपर ही स्कूटर करीत आहे. ​वाकडेवाडी कार्यालयात जाऊन आपण पुढील कार्यवाही करावी.’

हे वाचून मला आश्चर्य वाटले. फार मोठा आनंद झाला. मी पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये ती स्कूटर घेतली. तिचा नंबर आहे ‘MGF 1718’ आणि त्या दिवसापासून 1988 पर्यंत मी स्कूटर चालवत होतो. 88-89 साली महापौर असल्यामुळे महापालिकेची गाडी माझ्याकडे होती. महापौर पदावरून उतरल्यानंतर पुन्हा मी स्कूटर चालवू लागलो. 1992 व 94 पर्यंत मी स्कूटर चालवली. 94 साली जिल्हा बँकेची गाडी मला मिळाली. त्यानंतर 2003 मध्ये म्हाडाची गाडी मला मिळाली. म्हाडाची गाडी आजपर्यंत मी वापरत होतो.

15 वर्षाचा नियम आल्यामुळे ही गाडी मी वापरणं बंद केलं. आता बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर चालवत आहे. 1718 ही स्कुटर मला पवार साहेबांमुळे मिळाली. आज पवार साहेबांचा 81 वा वाढदिवस. या दिवशी मी ती पुण्यातील श्री पेंडसे यांच्या सायकल केंद्राला बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते सुपूर्त करीत आहे. तेथील प्रदर्शनामध्ये ते ही गाडी ठेवणार आहेत. आज ही गाडी सुपूर्त करीत असताना नगरसेवक राजेश यनपुरे पाटील, राजेश पंडित, अनिल यनपुरे इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ही गाडी देत असताना माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले. संदीप पाटील यांनी त्याला या प्रसंगाला “लेक चालली सासरला” अशी उपमा दिली असल्याचेही काकडे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंकुश काकडे यांनी त्यांना शरद पवार यांच्यामुळे मिळालेली पहिली गाडी आणि नंतर मिळालेल्या अनेक गाड्या यांचा मेळ घालून सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.