Pune: लॉकडाऊनमध्ये दारु विक्री करणाऱ्या चौघांना सहकारनगर परिसरातून अटक

Pune: Four arrested for selling liquor in lockdown in Sahakarnagar area

एमपीसी न्यूज – परवानगी नसतानाही दारू विक्री करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून देशी – विदेशी दारूचा तब्बल 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यातील सहकार नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

विठ्ठल दावलचा सावजी (रा. पोकळे वस्ती बिबवेवाडी), बबलू बन्सीलाल श्रीवास्तव, कालिदास किसन मिसळे (रा. दाते बस स्टॉपजवळ, सिद्धार्थनगर, सहकारनगर) आणि धीरज रामलाल परदेशी ( रा. बर्निंग घाट रोड बंड गार्डन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे काही पोलीस कर्मचारी सहकारनगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुप्रीम इंडस्ट्रियल परिसरात आरोपी दारूची विक्री करताना दिसले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर लॉकडाऊन आहे. या कालावधीत गर्दीच्या दुकान व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. असेे असतानाही आरोपींनी नियमांचा भंग करत दारू विक्री सुरूच ठेवली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

त्यांच्या ताब्यातून 80,893 रुपये किमतीची देशी दारू व बियरच्या बाटल्या आणि 2,630 रुपये रोख रक्कम असा एकूण 83,523 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चारही आरोपीना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भा. द. वि. 188, 269, 270, 34 आणि कोवीड 19 उपाययोजना नियम 11 व महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.