Pune : छावा संघटनेतर्फे नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्ससाठी मोफत प्रवासी सेवा

एमपीसी न्यूज – नायडू हॉस्पिटल येथील डॉक्टर व नर्स यांना हॉस्पिटलमध्ये ये – जा करण्यासाठी छावा संघटनेच्या माध्यमातून प्रवासासाठी मोफत वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज (शनिवारी) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी उपक्रमाचे आयोजक छावा संघटना प्रमुख धनंजय जाधव, गणेश सोनवणे, अविनाश सुर्यवंशी, द्वारकेश जाधव, रिक्षाचालक विशाल टकले, रिक्षाचालक आकाश कसबे,डॉक्टर व नर्सेस उपस्थित होते.

नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर किंवा नर्स प्रवासासाठी खासगी वाहन चालकांना फोन करतात. मात्र, नायडू हॉस्पिटल पत्ता सांगितल्यानंतर तेथे वाहतुकीची सेवा देण्यासाठी टॅक्सीचालक किंवा रिक्षा चालक नकार देतात. तसेच वाहन उपलब्ध नसतानासुद्धा काही डॉक्टर व नर्स कामावर हजर राहत असतात.

सध्या नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने त्यांना मोफत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले.

रविवारी (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यामुळे या दिवशी छावा संघटनेच्या रिक्षा अत्यावश्यक सेवा म्हणून डॉक्टरांची सेवा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.