Pune: पुण्यात काँग्रेस मोबाईल क्लिनिकद्वारे 17 हजारजणांवर मोफत उपचार – मोहन जोशी

Pune: Free treatment for 17,000 people through Congress Mobile Clinic in Pune - Mohan Joshi

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी काँग्रेसचे मोबाईल क्लिनिक सक्रीय झाले आहे. त्याद्वारे पुण्यातील 17 हजारजणांची आरोग्य तपासणी करुन त्या सर्वांना मोफत औषधोपचारही देण्यात आले आहेत अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रात काँग्रेस पक्ष काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 17 एप्रिलपासून पक्षाच्या वतीने मोबाईल क्लिनिक उपलब्ध करुन देण्यात आले. 17 एप्रिल रोजी मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी येथे मोबाईल क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत ही सेवा अखंडपणे सक्रीय आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहराच्या अनेक भागात, झोपडपट्ट्यांमध्ये डॉक्टरांकडे जाऊन तपासणी आणि उपचार करुन घेणे अतिशय मुश्कील झाले. डॉक्टरांची कमतरता जाणवत होती. औषधे मिळत नव्हती, परवडतही नव्हती त्यामुळे कोरोना तसेच त्याव्यतिरिक्त अन्य आजारांवरही उपचार आणि औषधे मिळणे अनेकांना अवघड झाले होते. समाजाची गरज लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन ची पुणे शाखा, भारतीय जैन संघटना, फोर्ब्स मोटर्स यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाने मोबाईल क्लिनिक ही मोहीम हाती घेतली. शहरातील वाड्या-वस्त्या, झोपडपट्ट्या, कन्टेंन्मेंट क्षेत्र अशा ठिकाणी जाऊन लोकांची तपासणी केली. हे काम अतिशय जोखमीचे होते. परंतु साऱ्या टीमने अतिशय धैर्याने हे काम केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व लोकांमध्ये जावून याउपक्रमाची, आरोग्य विषयाबाबत जनजागृती केली. त्यामुळे उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोबाईल क्लिनिकमधील अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा आणि एमबीबीएस, एमडी असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळे या सेवेचा दर्जा उच्च राहिला. प्रशासनालाही मोबाईल क्लिनिक सेवेद्वारे चांगले सहकार्य मिळाले असे जोशी यांनी सांगितले.

या मोहीमेमध्ये 41 रुग्ण असे आढळले की ते कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेत होते. हे निदान वेळीच झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या निदानाची माहिती प्रशासनालाही उपयुक्त ठरली. ते रुग्ण ज्या परिसरातील होते तिथे तातडीने साथ नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करता आल्या. मोबाईल क्लिनिकचा असाही चांगला उपयोग झाला. सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, बीपी आदी आजारांवरही मोबाईल क्लिनिकमध्ये तपासण्या होऊन उपचार करण्यात आले. आबालवृद्धांना या सुविधेचा फायदा झाला असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

शहरातील पीएमपीच्या डेपोंमध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. औषधोपचारही देण्यात आले. कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवदासींचीही आरोग्य तपासणी करुन त्यांना योग्य ती औषधे देण्यात आली. मोबाईल क्लिनिकमधील डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना पीपीई कीट, मास्क्स, सॅनिटायजर आदी सुविधा पुरविण्यात आल्या, उपचारांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध करून देता आली यांचे आम्हाला समाधान आहे. ही आरोग्य सेवा यापुढेही चालूच राहाणारे आहे.

या मोहीमेत इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे चे पदाधिकारी डॉ.राजन संचेती, डॉ.आरती निमकर, डॉ.संजय पाटील, डॉ.सुनील इंगळे, डॉ.आशुतोष जपे, डॉ.हिलरी रॉड्रीक्स आणि असंख्य डॉक्टरांचे सहकार्य लाभले. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोतच. पुणेकरांनीही काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, आरोग्य राखावे, आपल्याला या साथीवर लवकरात लवकर मात करायची आहे असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.