Pune : मेजर शशिधर नायर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात वीरमरण आलेल्या मेजर शशीधर नायर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नायर यांचा मावसभाऊ अश्वित नायर याने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी नायर यांचे नातेवाईक आणि हजारो पुणेकर उपस्थित होते. जमलेल्या पुणेकरांनी यावेळी शशीधर नायर अमर रहे, भारत माता की जय, हिंदुस्थान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या.

नायर यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणल्यानंतर ते वानवडीतील वार मेमोरियल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांच्या खडकवासला येथील राहत्या घरी काही काळ पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहतून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव वैंकुठ स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून नायर यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.