Pune : भविष्यातील शिक्षण हे ‘विद्यार्थी केंद्री’ असेल – डॉ.अभय जेरे 

Future education will be 'student centered' - Dr. Abhay Jere

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईन,  ऑफलाईन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक ‘विद्यार्थी केंद्री’ होईल. देशाला प्रश्न सोडविणारे, रोजगार निर्माण करणारे, तंत्र कुशल विद्यार्थी हवे असून त्याकडे लक्ष द्यावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांनी केले. 

 महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी’ तर्फे ‘फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ विषयावरील राष्ट्रीय वेबिनार गुरुवारी (दि.28)  आयोजित करण्यात आला होता.त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  सरकारचे शैक्षणिक नियोजन, शैक्षणिक प्रणाली 4.0, कोविड -19 नंतरची शैक्षणिक व्यवस्था या विषयावर वेबिनार मध्ये चर्चा झाली. 

जेरे म्हणाले, देशात तांत्रिक प्रशिक्षण घेणारे 80 लाख विद्यार्थी आहेत. सर्वच विद्या शाखांत मिळून 70 टक्के विद्यार्थी रोजगारापासून वंचित आहेत. तरीही भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप उद्योग असलेला देश आहे.

यापुढे तंत्र कुशल आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा लागेल. समस्या सोडविणारी, कल्पक, नव्या उद्योग संकल्पना मांडणारी पिढी हवी आहे. त्यांना व्यावसायिक पाठबळ देणारे इन्क्युबेटर लागतील असे जेरे म्हणाले. 

जेरे पुढे म्हणाले, केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण आणत आहे. पुढील पाच वर्षात शिक्षण पद्धती अधिक विद्यार्थी केंद्रित होईल. प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रगतीकडे ही शिक्षण पद्धती लक्ष देईल असेही डॉ.जेरे यांनी सांगितले.

इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप, समन्वयक सबा शेख यांनी संयोजन केले. महाविद्यालयांचे प्राचार्य, प्लेसमेंट ट्रेनिंग ऑफिसर, विभागप्रमुख,  प्राध्यापक, एचआर विभाग प्रमुख आदि या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.