Pune : गायकवाड काकांमुळे चुकलेली ‘ती’ मुलगी सुखरुप पोहोचली घरी

एमपीसी न्यूज – घरातील किरकोळ वादामुळे घराबाहेर अकोला येथून पुण्याकडे निघालेली मुलगी इंदापूर येथे अडकली. ‘संस्कार प्रतिष्ठान’चे मोहन गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे पोलीस आणि रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने ‘ती’ सुखरूप पुण्यात पोहोचली.

श्रद्धा कावरे असे या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरातील किरकोळ वाद आणि आलेला राग यामुळे अकोला येथुन श्रध्दा कावरे घरातून बाहेर पडली आणि पुण्याकडे निघाली. तिला पुण्याला यायचे होते. मात्र, ती चुकून इंदापुरला उतरली आणि पुढे ‘करोना’च्या दहशतीमुळे ती इंदापुरमध्ये अडकली.

स्वतःच्या संरक्षणासाठी तिने पोलीस स्टेशन गाठले. तिथे तिने इंदापुर पोलीस स्टेशनचे हवालदार नितीन पिंगळे यांना घडलेला प्रकार सांगितला. तिचे नातेवाईक पुणे येथे राहतात त्यांच्याकडे तिला जायचे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कोरोनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत रात्री या मुलीला पुण्याला कसे पाठवायचे? हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे पडला. हरीश कावरे यांनी तात्काळ संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड (काका) यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली.

दरम्यान, हरीश कावरे यांनी इंदापुरमधील त्यांच्या मित्रांना फोन केले. पण, तिला एकरात्र ठेवायला कोणी तयार झाले नाही. गायकवाड काकांनी खासगी गाड्यावाल्यांना फोन केले. मात्र, श्रद्धाला आणायला कोणीही तयार झाले नाही. शेवटी काकांचे पुण्यातील रुग्णवाहिका चालवणारे मित्र मोहन ठाकुर यांनी इंदापुरच्या रुग्णवाहिकेच्या चालकांना फोन केले. त्यातुनच नितीन खिलारे हे त्या मुलीला पुण्यात सोडायला तयार झाले.

दरम्यान, पोलीसांनी श्रद्धाला जेवण दिले. रात्री 12 वाजता गायकवाड काकांच्या आणि पोलीसांच्या मदतीने ती मुलगी हरीश कावरे यांच्या पाषाण येथील घरी रात्री तीन वाजता सुखरुप पोहोचली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.