Pune : गांधीजींचे अर्थशास्त्र खऱ्या समानतेचे- डॉ. चैत्रा रेडकर

'भांडवलशाहीची गांधीवादी समीक्षा ' व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- गांधीजींचे अर्थशास्त्र हे गरिबीचे अर्थशास्त्र अशी केली जाणारी टीका योग्य नाही ,गांधीजींचे अर्थशास्त्र हे खऱ्या समानतेचं होते, असे प्रतिपादन अभ्यासक डॉ. चैत्रा रेडकर यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी सप्ताह निमित्त ” भांडवलशाहीची गांधीवादी समीक्षा ” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी होते.

“कुटीर उद्योग वाढून उत्पादनाचे विकेंद्रीकरण करणे आणि मोठ्या उद्योगांशी त्यांची स्पर्धा होऊ देऊ नये, याकडे राज्य संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी गांधीजिंची भूमिका होती,असे मत डॉ.चैत्रा रेडकर यांनी मांडले.आंतरराष्ट्रीय मागणीनुसार उत्पादन न करता स्थानिक गरजा आणि मागणीनुसार उत्पादन करून मग जादा उत्पादन झाल्यास निर्यात करणे हा योग्य मार्ग आहे. पूर्वीच्या जातीव्यवस्थेत मर्यादित विकासाची शक्यता होती, वडिलोपार्जीत कौशल्य शिकून तोच धंदा करणे यात त्याचा व कुटुंबाचा विकासाला मर्यादा पडत. त्यामुळे जाती निर्मूलन होत नाही तोवर विकास होण्याची शक्यता कमी असे” असे रेडकर म्हणाल्या.

_MPC_DIR_MPU_II

डॉ रेडकर पुढे म्हणाल्या, “गांधीवादी अर्थशास्त्राचा विचार हा मुख्यता त्यांच्या ग्रामोद्योग ट्रस्टी शिप म्हणजे विश्वस्त संकल्पनेवर अधारित आहे, राज्यसंस्थांनी देशाचा कारभार हा एक प्रामाणिक विश्वस्त बनून पाहिला पाहिजे, अशी गांधींची भूमिका होती .गांधींना प्रातिनिधीक लोकशाहीची अपेक्षा व संकल्पना होती, पण आज लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले नेते एकदा निवडून गेले की मनाचा कारभार करतात, हम करेसो कायदा अशा तऱ्हेची नेत्यांची दादागिरी जनतेला सोसावी लागते. एकदा निवडून दिले की नेत्यावर जनतेचा कंट्रोल राहात नाही.ही लोकशाहीची आणि गांधीजींना अपेक्षित असलेल्या विश्वस्त संकल्पनेची मर्यादा आहे”

गांधींबरोबर राहून सी ए असणारे अर्थ तज्ञ जे सी कुमारप्पा यांनी गांधींच्या अर्थ नितीचा, विचारांचा जवळून अभ्यास केला, त्यावर लेखन केले.त्यांच्या मते कोणत्याही समाजाचा विकासाचा आराखडा समाज सापेक्ष असायला हवा, एकच आराखडा सर्वांना लागू करणे योग्य नाही, त्यामुळे विषमता वाढीस लागेल, असेही रेडकर म्हणाल्या

”गांधींचा मूलभूत विचार तसाच ठेवून त्यांच्या विचाराने आजच्या काळातील उद्योग शोधून काढणे आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिने प्रयत्न करणे हे आजच्या पिढीपुढचे महत्वाचे आव्हान आहे, असे मला वाटते .निसर्गाला नष्ट न करता उद्योग करता यावे हाच गांधींचा विचार जगाला तारू शकेल ”,असे डॉ कुमार सप्तर्षी अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले.

याच कार्यक्रमात नरेश बदनोरे लिखित ‘आपले बापू’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले .प्रास्तविक अन्वर राजन यांनी केले .सूत्रसंचालन संदीप बर्वे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.