Pune: गणेश मंडळांतर्फे 300 रुग्णांकरिता ‘कोविड केअर सेंटर’ सुरू- महापौर मोहोळ

Pune: Ganesh Mandal launches Covid Care Center for 300 patients says Mayor murlidhar Mohol महापालिकेसमवेत समन्वय साधण्यासाठी एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले असून अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळे जबाबदारी पार पाडणार आहेत.

एमपीसी न्यूज – शहरातील गणेश मंडळांतर्फे 300 रुग्णांकरिता ‘कोविड केअर सेंटर’ सुरू केले आहे. यात ग्रामदैवत श्री कसबा, ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, श्री तुळशीबाग, केसरी, श्री भाऊसाहेब रंगारी, श्री अखिल मंडई आणि श्री दगडूशेठ हलवाई या गणेशोत्सव मंडळांचा यात सहभाग आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या सर्व मंडळांचे समस्त पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद मानत असल्याचेही महापौरांनी सांगितले. महापालिकेसमवेत समन्वय साधण्यासाठी एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले असून अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळे जबाबदारी पार पाडणार आहेत.

सेंटरमधील सर्व व्यक्तींसाठी दैनंदिन भोजन, न्याहरी, चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी याची सुविधा पुरविण्यात येईल. मंडळांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे आयुष-मंत्रालयांनी व आयसीएमआरने प्रमाणित केलेले आयुर्वेदिक औषधे, काढे आणि रूग्णांसाठी गरम पाणी यांची सुविधा पुरविण्यात येईल.

कोविड केअर सेंटरसाठी पीपीई कीट, मंडळांनी सेंटरसाठी 1 एमबीबीएस व 3 बीएएमएस डॉक्टर्स यांचे पॅनेल नियुक्त करावे व त्यांच्यामार्फत केंद्रात दाखल रूग्णांना आयुर्वेदिक काढे व औषधे आपल्या जबाबदारीवर देण्यात यावी.

मंडळांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे सेंटरमध्ये 10 ऑक्सिजन बेड पुरविण्यात यावे, सेंटरमध्ये 24 तास सुरक्षारक्षक व्यवस्था पुरविण्यात यावी, सेंटरमधील रूग्ण क्षमता वाढीसाठी आवश्यक ते अतिरिक्त 100 बेड्स पुरविण्यात यावे, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत.

केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार स्वयंसेवक नेमण्याची जबाबदारी मंडळांची राहिल. सेंटरसाठी एक रूग्णवाहिका पुरविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.