Pune : बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी जेरबंद

दीड लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – पीएमपीएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मोबाईल आणि दागिने चोरणा-या टोळीस पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई गुरूवारी (दि.20) रात्री पावणेदहाच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मंग्या ऊर्फ मंगेश बाळू जाधव(वय 25, रा. हडपसर), उमेश ऊर्फ गड्डू राजू बिडलान (वय 23, रा. हडपसर), शिवा ऊर्फ शिवाजी विजय गौड (वय 21, रा. महंमदवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे विशेषत: महिलांचे दागिने, पैसे आणि मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा बसविण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कारवाई करत असताना पोलिसांना ताडीवाला रोड परिसरात काही इसम चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.

त्याप्रमाणे पोलिसांनी या परिसरात सापळा रचून तीन संशयितांना हटकले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन मिळाले. सुरूवातीला त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 45 हजारांचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले.

याप्रकरणी आतापर्यंत त्यांनी केलेले पाच गुन्हे उघडकीस आणले असून पुढील तपास चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.