Pune : नोकरीचे अमिष दाखवून तरुणांना फसविणारी टोळी गजाआड; 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – रांजणगांव एमआयडीसीमधील बहुराष्ट्र कंपनीत नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून सुशिक्षित तरुणांना फसविणाऱ्या टोळीस पोलिसांनी गजाआड केले. यात एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, दुचाकी, मोबाईल, 13,500 रुपये अशी सुमारे 5 लाख 44 हजार 500 रुपये किमतीही मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी अभिजित युवराज पाटील (वय २४, रा. विसर, ता. मिरज, जि. सांगली) आणि त्याचा मित्र शंतनू शिवाजी पाटील यांनी रांजणगांव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार अंकुश रावसाहेब मलगुंडे (वय २८, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे), साहिल संतोष कोकरे (वय २०, रा. भटवाडी जामखेड, ता. जामखेड, जि. नगर), महेश रमेश काळे (वय २१, रा. माहिजळगाव, ता.कर्जत, जि. नगर) आणि जयश्री भगवान कांबळे (वय २१, सध्या. रा. यशइन चौक, कोरेगाव, ता. शिरूर, जि. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपींनी एका दैनिकात जाहिरात देऊन तरुणांना चांगल्या पगाराची परमनंट नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार अभिजित पाटील आणि त्याचा मित्र शंतनू यांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानुसार त्यांना रांजणगांव एमआयडीसीत येण्यास सांगितले. त्यानुसार दोघेही १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ च्या सुमारास रांजणगांव एमआयडीसीत येऊन फोन केला. यावेळी त्यांना कंपनीची गाडी तुम्हाला नेण्यास येईल असे सांगितले. त्यानुसार एक कार त्यांना नेण्यास आली.

त्यानंतर दोघांना एका कंपनीत नेऊन त्यांच्याकडून फीच्या नावाखाली पैसे घेतले आणि बूट आणि कपड्याची वेगळे पैसे लागतील असे म्हणून त्याचीही मागणी केली. यावेळी दोघांनी पैसे देण्यास नकार देताच दोघांना मारहाण करण्यात आली. यानंतर दोघांनी रांजणगांव एमआयडीसीमध्ये याची तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी पथके नेमून खबऱ्यानुसार तिघांना गजाआड केले. तसेच फोन करून भुरळ घालणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केले आहे. या संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबर २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रांजणगांव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.