Pune : अखेर गरवारे महाविद्यालयाने सत्यनारायणाची पूजा घातलीच !

एमपीसी न्यूज- फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेचे प्रकरण ताजे असतानाच आता गरवारे महाविद्यालयाने आज (बुधवारी) सत्यनारायण पूजेचे आयोजन करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. वास्तविक यापूर्वी आयोजित करण्यात आलेली सत्यनारायण पूजा गरवारे महाविद्यालय प्रशासनाने रद्द केलेली होती. त्यामुळे सत्यनारायण पूजेला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अलीकडेच श्रावण महिन्यानिमित्त पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे एखाद्या मंदिरासमोर लावल्याप्रमाणे ‘सर्वांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा’ असा बोर्डच लावण्यात आला होता. या प्रकारचा विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाविद्यालयाला देवालय बनवण्यात आल्याचे म्हणत काही विद्यार्थी संघटनांनी यावर आक्षेप नोंदवून विरोध प्रकट केला होता.

दरम्यान गरवारे महाविद्यालयाने देखील सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. मात्र फर्ग्युसन महाविद्यालयातील पूजेला झालेला विरोध पाहून गरवारे महाविद्यालय प्रशासनाने ही पूजा रद्द केल्याचे जाहीर केले. एकंदरीत सत्यनारायण पूजेचा वाद निवळला असताना पुन्हा गरवारे महाविद्यालयाने आज सत्यनारायण पूजा घातली. आता सत्यनारायण पूजेला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.