Pune : औद्योगिक पट्ट्यातील समस्यांमुळे त्रस्त जर्मन कंपन्या शांघायच्या वाटेवर ?

जिल्हाधिकाऱ्यांसमोर जर्मन कंपन्यांच्या शिष्टमंडळाने वाचला समस्यांचा पाढा

एमपीसी न्यूज- पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण या औद्योगिक भागातील उद्योजक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. उत्तम रस्ते, वेगवान वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अभाव, गुंडगिरी, कामगार संघटनांचा त्रास या परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यास या कंपन्यांनी चीनमधील शांघाय येथे स्थलांतरित होण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी जर्मन कंपन्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या उद्योजकांनी त्यांच्या समोरील समस्यांचा पाढा वाचला.

या बैठकीला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. युरगेन मोऱ्हाड आणि त्यांचा सहकारी, जर्मन कंपन्यांचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्य़ातील औद्योगिक भागात रस्ते चांगले नाहीत, पायाभूत सुविधा नाहीत, स्थानिक गुंडगिरीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे यांसारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या कंपन्यांची अपेक्षित वाढ होत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. या समस्या स्थानिक पातळीवर सहजरीत्या सोडवता येण्यासारख्या आहेत. असे कंपन्यांचे म्हणणे असून ही परिस्थिती न सुधारल्यास पुण्यातील कंपन्या चीनमधील औद्योगिक शहर असलेल्या शांघाय येथे नाइलाजाने स्थलांतरित कराव्या लागतील, असा इशारा देण्यात आला.

पिंपरी चिंचवड महापालिकेला सर्वाधिक महसूल औद्योगिक क्षेत्रातून मिळतो. तरीदेखील या परिसरात उद्योजकांसाठी मूलभूत सुविधांची वानवा आहे. चाकण एमआयडीसी, सणसवाडी या ठिकाणी रस्ते, पाणी, मलनि:सारण अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राम यांनी जर्मन कंपन्यांच्या शिष्टमंडळाला दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.