Pune: कोरोना चाचण्यासाठी सवलतीचे दर द्या, महापौरांचे खासगी प्रयोगशाळांना आवाहन

Pune: Give concessional rates for corona testing, mayor appeals to private laboratories या चाचण्यांसाठी सुमारे 4,500 रूपयांचा खर्च आकारला जात होता. मात्र, शासनाने शनिवारी हा दर 2,200 रुपये निश्‍चित केला आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचा प्रसार रोखायचा असल्यास मोठ्या प्रमाणात संशयितांच्या चाचण्या होणे आवश्‍यक आहे. शासकीय चाचण्यांची संख्या मर्यादित असल्याने खासगी प्रयोगशाळांकडून चाचण्या करून घेण्यासाठी महापालिका तयार आहे. मात्र, त्यांनी सवलतीचे दर द्यावेत, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

कोरोना चाचणीसाठी ‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेल्या खासगी तपासणी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींची बैठक मुरलीधर मोहोळ यांनी महापौर बंगल्यावर घेतली.

शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी महापौरांनी वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. शहरात सध्या 11 खासगी तर 4 शासकीय करोना तपासणी प्रयोगशाळा आहेत. त्यांची एकूण तपासणी क्षमता 9 हजार चाचण्यांची आहे.

मात्र, महापालिका रुग्णालयांतील रुग्णांची चाचणी फक्त शासकीय रुग्णालयातच केली जाते. त्यांची दरदिवशी क्षमता जवळपास 1500 आहे. या प्रयोगशाळांच्या चाचण्यांची क्षमता वाढण्यास आणखी कालावधी लागणार असल्याने महापौरांनी पुढाकार घेत खासगी प्रयोगशाळांना साकडे घातले आहे.

या चाचण्यांसाठी सुमारे 4,500 रूपयांचा खर्च आकारला जात होता. मात्र, शासनाने शनिवारी हा दर 2,200 रुपये निश्‍चित केला आहे.

मात्र, तोदेखील महापालिकेस परवडणारा नसल्याने त्यापेक्षा कमी दरात चाचण्या कराव्यात. त्याचा खर्च महापालिका देईल, असे आश्‍वासन मोहोळ यांनी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींना दिले आहे.

महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, डॉ. अंजली साबणे यावेळी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.