Pune : पुणेकरांना पाणी द्या अन्यथा पालिका निवडणुकीतही फटका बसण्याची नगरसेवकांना भीती

एमपीसी न्यूज – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. धरणांत 90 टक्के पाणीसाठा आहे, त्यामुळे आता तरी पुणेकरांना 2 वेळ चांगला पाणीपुरवठा करा, अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची भीती नगरसेवकांनी बोलून दाखवली. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने जलसंपदा विभागाशी 11.5 टिएमसी पाणी करार करण्यास मान्यता दिली.

मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांना 17 टीएमसी पाणी मिळावे यासाठी, राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. तो प्रस्ताव अद्यापही मंजूर करण्यात आला नाही. नवीन सरकारकडून पुणेकरांना वाढीव पाणीसाठा मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाजीनागर भागातील डेक्कन, आपटे रोड, पोलिस लाईन परिसरात पाण्याची टंचाई आहे. 24 बाय X 7 समान पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव पाणीपट्टी मंजूर करुन घेतली. पण, नागरिकांना 24 तास पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. यावर्षी वरुणराजाने दमदार हजेरी लावत धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा झाला होता. तर, 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी नदीतून सोडण्यात आले. हे पाणी पुणेकरांना मिळायला हवे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.