Pune : ‘मिरी निर्यातीची कोकणातील शेतकऱ्यांना चांगली संधी’

'ग्लोबल कोकण फेस्टिव्हल' मधील परिसंवादाचा सूर

एमपीसी न्यूज- ‘जगात फक्त 5 देशात काळी मिरीचे उत्पादन होत असल्याने कोकणवासीयांना काळी मिरी लागवडीतून निर्यातीची चांगली संधी आहे त्यातून कोकणातील शेतकऱ्याला आर्थिक समृद्धी मिळवता येईल ‘ असा सूर ग्लोबल कोकण फेस्टिव्हल मधील परिसंवादात उमटला.

‘आधुनिक शेती ;कोकणचे वैभव ‘ या परिसंवादात हा सूर उमटला . फलोत्पादन तज्ज्ञ विजय जोगळेकर ,कृषी तज्ज्ञ प्रभाकर सावे, मसाला पिकांचे तज्ज्ञ मिलिंद प्रभू ,कृषी -पणन मंडळाचे अधिकारी जयसिंग पाटील ,बी .व्ही .जी . इंडिया कंपनीतील कृषी तज्ज्ञ पी . कोळेकर यांनी या परिसंवादात भाग घेतला.

मसाला पीक तज्ज्ञ मिलिंद प्रभू म्हणाले,’काळी मिरी जितकी पिकवू तितकी विकली जाते. कोकणात फार्मा कंपन्या त्या विकत घेतात आणि निर्यात करतात. काजू आणि काळी मिरी एकत्र घेतली तर दुप्पट फायदा होतो’

‘शेती पाहणे हा सुद्धा पर्यटनाचा विषय झाल्याने पर्यटकांना शेती कशी होत असते, हे पाहण्याचे कुतूहल असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण शेती प्रयोग केल्यास कृषी आणि पर्यटन विषयक असे दोन्ही प्रकारचे लाभ होऊ शकतात’,असे मत प्रभाकर सावे यांनी व्यक्त केले .

विजय जोगळेकर म्हणाले, ‘वनस्पती शास्त्राची ओळख असेल तर फळबागायतीमधून चांगला फायदा होतो. या शास्त्राची जाण वाढवणे आवश्यक आहे . फलोत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धती महत्वाची असून सिंचनाचा विचार करताना पाणी बचतीपेक्षा अन्नद्रव्ये मुळाशी शंभर टक्के पोचतील यावर भर द्यावा’

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे संयोजक संजय यादवराव,एम . क्यू .सय्यद, किशोर धारिया यांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.