Pune: गुड न्यूज! अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबातील पाचही जण कोरोनामुक्तीकडे!

एमपीसी न्यूज – अंगणवाडी सेविका दोन दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाल्यानंतर आज (शनिवारी) तिचे पती, मुलगा, बहीण, मेहुणे आणि भाची या पाचही नातेवाईकांचे 14 दिवसांनंतरचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

या पाचही जणांच्या घशांतील द्राव उद्या (रविवारी) पुन्हा कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यात हे रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याबाबत डॉक्टर निर्णय घेतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोणत्याही परदेश दौऱ्याची पार्श्वभूमी नसताना वसईला जाऊन आलेल्या अंगणवाडी सेविकेला कोरोनाची लागण झाली व त्या पाठोपाठ तिच्या कुटुंबीयांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या बातमीने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले होते. आता अंगणवाडी सेविकेनंतर तिचे कुटुंबीय देखील बरे झाल्याने पुणेकरांना एक मोठी दिलादायक बातमी मिळाली आहे.

निवारा केंद्रातील महिलेने गोंडस चिमुरडीला दिला जन्म!

लॉकडाऊनच्या काळात मनपाच्या ढोले पाटील रस्त्यावरील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेतील बेघर निवारा केंद्रात आश्रयाला आलेल्या राणाबाई साहेबराव आडागळे या महिलेने कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये काल गोंडस मुलीला जन्म दिला.

राणाबाई या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील असून त्यांचे पतीही यावेळी सोबत होते. या महिलेची मनपामार्फत व्यवस्थित काळजी घेण्यात आली असून महिला आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले

एक देश, एक प्रकाश; उजळू सारे आकाश!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व पुणेकरांनी उद्या (रविवारी) रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद करून दिवा, मोबाईल फ्लॅश, मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या दारं, खिडकी, सज्जयावर उभे राहावे आणि आपल्या देशातील ऐक्याचे उदाहरण द्यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.