Pune Good News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 82.23 टक्के पाणीसाठा 

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल 82.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना वर्षभर 2 वेळा पाणीपुरवठा होण्याची चिंता मिटली आहे. 

 खडकवासला 1.97 टीएमसी (100%)

पानशेत  9.82 टीएमसी (92.19%),

वरसगाव 9.96 टीएमसी (77.78%),

टेमघर 2.34 टीएमसी (62.75%)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांत तब्बल 23.97 टीएमसी म्हणजेच 82.23% पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी, आजच्या तारखेला  29.15 टीएमसी म्हणजे 100% धरणे भरली होती. ही आकडेवारी रविवारी (16 ऑगस्ट) सकाळी 6 पर्यंतची आहे. सध्या धरण क्षेत्रात रोजच जोरदार पाऊस होत असल्याने ऑगस्ट महिन्याच्या शेवटीच ही धरणे भरण्याची चिन्हे आहेत.

खडकवासला धरणातून काल सायंकाळी साडे सातपासून 16 हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आलेला विसर्ग आता 9 हजार 350 क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणावर दिवभरात विसर्ग वेगात बदल होत राहतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, पुणे महापालिकेतर्फे महिन्याला धरणातून दीड टीएमसी पाणी उचलले जाते. वर्षाला पुणेकरांना या हिशोबाने 18 टीएमसी पाणी लागते. आता तब्बल 23. 97 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे पाणी आता शेतीलाही देता येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणखी दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.