Pune News : नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; 12 डिसेंबरपासून पुण्यात नाटकांची घंटा वाजणार

एमपीसी न्यूज – पुण्याचे प्रेक्षक अतिशय चोखंदळ आणि नाट्यप्रेमी असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोणत्याही नाट्यप्रयोगांची सुरुवात सहसा पुण्यातून केली जाते. कोरोना काळातील लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा नाट्यगृहे सुरु होत आहेत. ही नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. तर 12 डिसेंबर पासून पुण्यात नाट्यप्रयोग सुरु होत असून ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘पुन्हा सही रे सही’ या दोन नाटकांनी नाट्यगृहे सुरु होणार आहेत.

राज्य सरकारने चित्रपटगृहे उघडण्यासाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर नाट्यनिर्माते देखील तयारीला लागले आहेत. सरकारने नाट्यगृहे देखील सुरु करण्यास परवानगी दिली असून नाट्यगृहांमध्ये तब्बल आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा नाटकाची घंटा वाजणार आहे.

12 डिसेंबर रोजी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. 13 डिसेंबर रोजी दुपारी याच नाटकाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर आणि रात्री चिंचवड येथे होणार आहे.

त्यानंतर पुढच्या आठवड्यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेले ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम पळून हे नाट्यप्रयोग होणार असल्याची माहिती पुण्याचे नाट्यप्रयोगांचे समन्वयक समीर हंपी यांनी दिली.

महिनाअखेरीस हृदयनाथ मंगेशकर यांचा ‘अक्षयगाणी-अभंगगाणी’ हा लॉकडाऊन नंतरचा पहिला जाहीर कार्यक्रम होणार आहे. नाट्यकलेला पुन्हा गती यावी म्हणून पुण्यातल्या सुदर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे रंगमंच या दोघांनीही प्रायोगिक प्रयोगांसाठीचं भाडं माफ केलं आहे. त्यामुळे आता इथे प्रयोग करायचा असेल तर केवळ ध्वनि यंत्रणा आणि प्रकाश योजनेचं भाडं द्यावं लागेल.

लॉकडाऊन नंतर प्रेक्षकांना नाट्यप्रयोगांकडे खेचण्यासाठी नाट्यनिर्माते नवनवीन कल्पना राबवणार असल्याचे नियोजन सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.