Pune: Good News – शहरातील ते दोन्ही पहिले कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आता झाले ‘निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी एक मोठी चांगली बातमी आहे. राज्यातील पहिले कोरोनाबाधित दाम्पत्य पुण्यात आढळले होते. ते आता बरे झाले आहे. महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 14 दिवस उपचार घेतल्यानंतर या पती-पत्नींच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटीव्ह’ आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. अजून 24 तासांनी या दोघांची कोरोना निदान चाचणी घेण्यात येणार आहे. ती देखील निगेटीव्ह आल्यास दोघे पूर्ण बरे झाल्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे नायडू रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व सर्व कर्मचाऱ्यांचे महापौरांनी विशेष अभिनंदन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर असून त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. आतापर्यंत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पहिले कोरोनाबाधित दाम्पत्य बरे झाले, ही बातमी सर्वांसाठीच खूप दिलासा देणारी आहे.

कोरोना योग्य उपचारांनी पूर्ण बरा होतो, हे या घटनेने अधोरेखित झाले आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमधील एका प्राध्यापक महिला देखील कोरोनामुक्त झाली. आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण 22 रुग्ण उपचारांनंतर ठणठणीत बरे झाले आहेत. 

दुबईहून परत आलेल्या या दाम्पत्यापैकी पती 51 वर्षीय तर पत्नी 49 वर्षीय आहे. प्रारंभी त्यांना कोरोनाची काहीही लक्षणे आढळून न आल्याने ते घरीच होते. पुढे त्रास जाणवू लागल्याने त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल नऊ मार्चला प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. ते दोघे राज्यातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण ठरले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1