Pune Good News: शहरात उरले फक्त 19 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण! सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या 11 दिवसांत लक्षणीय घट

कोरोना रुग्ण दुपटीकरणाचा वेगही सुमारे 42 दिवसांपर्यंत मंदावला

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ असल्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा देणारी आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या 11 दिवसांत पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची टक्केवारी 27 वरून 19 टक्क्यांपर्यंत खाली आहे. त्याच बरोबर कोरोना रुग्ण दुपटीकरणाचा वेगही मंदावला असून आता तो कालावधी जवळजवळ 42 दिवसांपर्यंत वाढला आहे. 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून यासंदर्भातील आकडेवारी काल रात्री उशिरा जाहीर केली. पुण्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट ! गेल्या 11 दिवसांत पुणे शहरातील कोरोनाबधित रुग्ण संख्येत मोठी घट नोंदवण्यात येत असून 7 ऑगस्ट रोजी 17 हजार 033 इतकी असलेली ही संख्या आता 17 ऑगस्ट रोजी 14 हजार 442 पर्यंत खाली आली आहे. टक्केवारी 27 वरुन 19 टक्क्यांपर्यंत खाली आहे, असे महापौरांनी म्हटले आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे आपोआपच सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे आणि लवकर आपण कोरोनावर पूर्ण मातही करू शकू, असा विश्वास महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला.

पुणे शहरात आतापर्यंत एकूण 3 लाख 64 हजार 444 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातून 74 हजार 933 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. पुण्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण प्रती दहा लाख लोकसंख्येमागे 82 हजार 287 इतके आहे.  झालेल्या चाचण्यांमध्ये 20.56 टक्के चाचण्यांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

आतापर्यंत 58 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 78.34 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही समाधानाची बाब आहे. आतापर्यंत शहरात एकूण 1 हजार 785 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृतांची टक्केवारी 2.38 पर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.

शहरात सध्या कोरोनाचे 14 हजार 442 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 7 हजार 689 रुग्ण होम आयसोलेशमध्ये उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैकी 765 जणांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. एकूण 464 रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून 301 रुग्णांवर अतिदक्षता विभागात विशेष निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.