Pune : टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात शहराच्या अनेक भागात धान्याची टंचाई

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीचा आता तिसरा टप्पा सुरु झाला असून या टप्प्यात शहराच्या सर्व भागात धान्याची टंचाई जाणवत आहे. येत्या चार, पाच दिवसांनी ही टंचाई अधिक जाणवेल, असा अंदाज आहे.

टाळेबंदी लागू झाल्यापासून रेशनवर पुरेसे धान्य मिळाले नाहीच. २५ एप्रिलपासून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना रेशनवर स्वस्त धान्य मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पुण्यात एक हजारच्या आसपास रेशनची दुकाने आहेत. त्यापैकी कोणत्याच दुकानात पुरेसे धान्य मिळत नाही अशा तक्रारी आहेत. पिवळ्या रेशनकार्डधारकांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ एवढेच धान्य देऊन दुकानदारांनी त्यांची बोळवण केली. साखर, गहू, डाळी या वस्तू रेशनवर मिळाल्याच नाहीत.

केशरी रेशनकार्डधारकांना फक्त गहू, तांदूळ मिळाले. त्यातही चुकीचे दर लावलेल्या पावत्या मिळाल्याच्या तक्रारी आहेत. नागरी पुरवठा खात्याच्या प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण या दुकानदारांवर नाही, त्यांच्याकडून या दुकानदारांवर काहीच कारवाई होत नाही अशा तक्रारीही लोकांनी केल्या आहेत. रेशन दुकानांवर काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत लक्ष ठेवू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मात्र तशी कोणतीच यंत्रणा आढळली नाही.

शहरातील कसबा पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ आदी पेठांमधील खाजगी किराणा दुकानातही धान्याचा तुटवडा जाणवत आहे. कडधान्य, ब्रँडेड तेल, आटा, ज्वारीचे पीठ आदी वस्तू मिळत नाहीत आणखी चार, पाच दिवसांनी तर धान्य टंचाई तीव्र होईल. या परिस्थितीमुळे लोकं हवालदिल झाली आहेत.

रेशनवर पुरेसे धान्य नाही, खाजगी किराणा दुकानांमध्येही धान्य उपलब्ध नाही यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.