Pune/Hadapsar : …अन् मंत्री छगन भुजबळ यांनी मोडले आदेश

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने राज्य शासनाने सार्वजनिक व इतर कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तरीही, हडपसरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी एका शाळेचे उदघाटन करून शासनाचे आदेश मोडले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव, मॉल्स, व्यायामशाळा, नाट्यगृहे, सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हडपसर येथील ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे उदघाटन राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते.

‘करोना’चा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने शाळांना सुट्टी दिली आहे. आदेशाचं पालन न करणार्‍या संस्थाचालक, शिक्षक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. तर, ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन दोन वेळा करण्यात आले होते. पण, प्रत्येकवेळी हा कार्यक्रम पुढे घ्यावा लागला.

आज घेण्यात आलेला कार्यक्रमही पूर्वनियोजित होता. कोणतेही भाषण, सभा न होता विद्यार्थ्यांना घरी सोडले जाईल, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.