Pune : हडपसर पोलिसांकडून अट्टल वाहन चोरट्यास अटक; चार लाखांच्या सात दुचाकी जप्त

Hadapsar police arrest strong vehicle thief; Seven two-wheelers worth Rs 4 lakh seized

एमपीसी न्यूज : हडपसर, कोंढवा, बंडगार्डन परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल वाहन चोरट्यास हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपीकडून 3 लाख 85  हजारांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्याकडून वाहन चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

शहारुख रज्जाक पठाण (वय 23, रा., रा. शेळके मळा,  यवत,  ता. हवेली,  मुळगाव उदाचीवाडी, वनपुरी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे ),  असे  अटक आरोपीचे नाव आहे.

पुणे शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध करुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे व पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या सुचनेनुसार हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी सपोनि चव्हाण, पोलीस उप निरीक्षक हिमालय जोशी यांनी जबरी चोरी, घरफोडी चोरी, वाहन चोरी चोरीच्या गुन्हयांचा तपास सुरु केला.

पोलीस नाईक नितीन मुंढे व विनोद शिवले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी पुणे येथे सापळा शहारुख रज्जाक पठाण याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील होंडा ॲक्टिव्हा (एमएच 12 एलएच 2632) बाबत चौकशी केली असता ही दुचाकी शेवाळवाडी, मांजरी येथून चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस चौकशीत त्याने हडपसर, कोंढवा, बंडगार्डन या परिसरामध्ये वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्याने चोरलेल्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

दरम्यान, शहारुख  पठाण याला या पूर्वी फरासखाना पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून चोरीच्या 26 दुचाकी, 3 चारचाकी व 1 टॅम्पो हस्तगत करण्यात आला होता. आरोपी पठाण याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अटक आरोपीकडून हडपसर पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचे 2 गुन्हे व कोंढवा पोलीस स्टेशनकडील 1 गुन्हा तसेच बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील 2 असे वाहन चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडून एकूण 3, 85,000 रुपये किंंमतीच्या 7 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस हवालदार रमेश साबळे, राजेश नवले,पोलीस नाईक प्रताप गायकवाड, गोविंद चिवळे, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, पोलीस शिपाई नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.