Pune : हँडबॉल संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या विरोधात 25 हजारांची लाच मागिल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज- राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक यांच्याकडून पडताळणी करून देण्यासाठी खेळाडूकडे 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महाराष्ट्र हॅण्डबॉल संघटनेचा पदाधिकारी व पुणे जिल्हा हँडबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हॅण्डबॉल संघटनेचा पदाधिकारी रुपेश मोरे (वय 40 रा. भेकराई नगर, फुरसुंगी )व पुणे जिल्हा हँडबॉल संघटनेचा पदाधिकारी राजेश गारडे (रा. वाघजाई कॉम्प्लेक्स, भेकराई नगर, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार खेळाडूने 2017 मध्ये राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी खेळाडू प्रवर्गातून भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यासाठी त्यांच्याकडे असलेले राज्यस्तरीय हॅन्डबॉल खेळामध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून पडताळणी करून हवे होते.

या कामासाठी महाराष्ट्र हॅण्डबॉल संघटनेचा पदाधिकारी रुपेश मोरे व पुणे जिल्हा हँडबॉल संघटनेचा पदाधिकारी राजेश गारडे यांनी त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगत खेळाडूकडे 35 ते 40 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 25 हजार रुपये देण्याचे ठरले. खेळाडूने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीची 20 सप्टेंबर 2019 रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये दोन्ही आरोपींची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून रुपेश मोरे व राजेश गारडे यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सीमा मेहेंदळे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.