Corona Vaccine Update : राज्यात पुण्यात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार

एमपीसी न्यूज : राज्यात पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार केला आहे. पुण्यासह जिल्ह्यातील सातारा, सोलापूर जिल्ह्यात एकूण 72.7 टक्के लसीकरण झाले आहे. पुण्याचा विचार केला असता फक्त पुण्यात 63 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे राज्यातील पुणे शहरातील लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तीन केंद्रांवरही लसीकरण मोहिमेने शंभरीचा टक्के पार केला आहे. पुण्यातील सध्या आठ केंद्रांवर लसीकरण सुरु झाले आहे. यातील पुणे महापालिकेच्या कोथरुड येथील सुतार दवाखाना, रुबी हॉल क्लिनिक, तसेच जिल्ह्यातील जुन्नर ग्रामीण रुग्णालयात 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे.

पुणे शहरातील आठ केंद्रावर 800 पैकी 502 जणांना लस देण्यात आली तर ग्रामीण भागात 15 ठिकाणाच्या 1500 पैकी 992 जणांना लस टोचण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात एकूण 62 टक्के लसीकरण झाले आहे. दौड उपजिल्हात रुग्णालयात सर्वात कमी म्हणजे फक्त चार जणांनी लस घेतली आहे. त्यापाठोपाठ सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ १४ जणांनी लसीकरण केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 800 पैकी 419 जणांनी लसीकरण केले. एकूण 52 टक्के लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अश्विनी रुग्णालय, सोलापूर सरकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय केंद्रांवर 100 टक्के लसीकरण झाले. सोलापूर जिल्ह्यात 1,100 पैकी 1,082 पैकी 98 टक्के लसीकरण केले. पुणे विभागात पाच हजार 100 पैकी तीन हजार 707 जणांनी लसीकरण केल्याने 72.7 टक्के लसीकरण केले आहे, साताऱ्यात 900 लाभार्थ्यांपैकी 772 जणांनी लस घेतली आहे.त्यामुळे साताऱ्यात 86 लसीकरण झाले आहे.

तर सातारा जिल्हा रुग्णालयात 158 कर्मचाख्यांनी लस घेतली. त्याप्रमाणे कराड उपजिल्हा रुग्णालयात 153 जणांनी तर वाईच्या मिशन रुग्णालयात 103 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. त्या केंद्रांवर 100 टक्क्यांहून अधिक लसीकरण झाल्याची नोंद झाली. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे राज्याचा एकंदरीत लसीकरणाचा विचार केला असता पुण्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

राज्यात शनिवारी 290 केंद्रांवर 24 हजार 282 (83 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वांत जास्त गोंदिया जिल्ह्यात 143 टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत एकूण 99 हजार 242 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.