Pune : कुटुंबाला संपवण्याचा तयारीनेच ‘तो’ निघाला होता……

सदाशिव पेठेतील अ‍ॅसिड हल्ला प्रकरण

एमपीसी न्यूज- सदाशिव पेठेत टिळक रस्त्यावर एका तरुणावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातून नवीन माहिती पुढे आली आहे. पोलिसांवर गोळीबार करून अखेर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणारा सिद्धराम विजय कलशेट्टी (वय 23) हा जखमी तरुणाच्या कुटुंबाला संपविण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याच्याजवळ सापडलेल्या बॅगेमध्ये दोन कोयते, दोन रॅम्बो चाकू, पंच, पिस्तूल अशी हत्यारे आढळून आली आहेत.

याबाबतची माहिती अशी की, अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाच्या आईने ऑक्टोबर 2018 मध्ये कलशेट्टीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. या गुन्ह्यात कलशेट्टी याला अटक करण्यात आली होती. ती केस मागे न घेतल्याचा राग कलशेट्टी याच्या मनात होता. त्या रागातूनच त्याने संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबाला संपविण्याचा कट रचला.

त्यानुसार टिळक रस्त्यावर बादशाही हॉटेलजवळ मंगळवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास जखमी तरुण त्याच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी मागून चालत आलेल्या सिद्धराम कलशेट्टी याने तरुणाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकले. त्यानंतर कलशेट्टी हा नवी पेठेतील आनंदी निवास या इमारतीच्या गच्चीवर पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कलशेट्टी याला पकडण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच कलशेट्टी याने पोलिसांच्या दिशेने पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार केला. आपण पकडले जाणार हे पाहून त्याने अखेर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचवेळी तो लिफ्टच्या ‘डक्ट’मध्ये पडला.पोलिसांनी त्वरित अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एक तासाच्या प्रयत्नानंतर हल्लेखोर कलशेट्टी याचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.