Pune  : कोरोनामुळे झोपडपट्टयांचा प्रश्न ऐरणीवर : सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे झोपडपट्टयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अतिशय दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्या अथवा साधी घर, अरूंद बोळ, सार्वजनिक नळ कोंडाळी व सार्वजनिक शौचालये असल्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारे सहा फुटांचे अंतर राखणे तेथील नागरिकांना अशक्यच होत असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी सांगितले. 

या जीवघेण्या संकटामुळे शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुर्नव्यवस्थापनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पुण्यात सुमारे 550 झोपडपट्टयांमध्ये सुमारे 40 ते 42 टक्के नागरिक राहतात. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी वाल्मिकी-आंबेडकर योजना, बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन योजना, राजीव गांधी आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना अशा अनेक योजना राबविण्यात आल्या.  मात्र, हा प्रश्नच एवढा गहन होता की या योजनाही त्यासाठी अपुर्‍याच ठरल्या.

मंगळवार पेठेतील झोपडपट्टयांचे मी केलेल्या पुनर्वसनामुळे तेथे आता झोपडपट्टी नाही आणि मुख्य म्हणजे कोव्हिड 19 कोरोना व्हायरसचाही प्रादुर्भाव नाही. खर्‍या अर्थाने हे सदानंदनगर आनंदी राहिले आहे.

सार्स, निपा, इबोला, डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि आता कोरोना व्हायरस सारखे संसर्गजन्य रोग झोपडपट्टयांमध्येच अधिक वेगाने पसरतात. यामध्ये त्या गरीब नागरिकांचा काहीच दोष नसतो. त्यांचे पुनर्वसन अधिक चांगल्या रितीने वेगाने होण्यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवर फार मोठी धडाकेबाज योजना आखून त्याची अगामी 5 ते 10 वर्षात अंमलबजावणी व्हावी.

या गरीब नागरीकांसाठी प्राथमिक, आरोग्य आणि शिक्षण यासाठी फार मोठी तरतूद केली जावी, तरच त्या झोपडपट्टयांचे रूपांतर चांगली घरे असणार्‍या इमारतींमध्ये होईल. घरातच शौचालय,  बाथरूम व पाण्याचा नळ असल्यामुळे अशा अपत्तीच्या वेळी एकत्र येण्याची गरज संपेल.

सोशल डिस्टन्सिंग देखील पाळता येऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गरीबांच्या कल्याणासाठी, गरीब मजूरांच्या मदतीसाठी तसेच झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आपण प्रत्येकानेच त्यांना साथ द्यायला हवी, असेही सदानंद शेट्टी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.