Pune : घरकाम करणाऱ्या 93 महिलांची आरोग्य तपासणी

Health check-up of 93 housewives

एमपीसी न्यूज – दिवा प्रतिष्ठानकडून शिल्पा सोसायटी इथे घरकाम करायला येणाऱ्या ९३ महिलांची डॉ. उभे व डॉ. शार्दुल यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कामाची परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी सोसायटीचे चेअरमन आनंद जोशी, हर्षवर्धन दीपक मानकर, राजेंद्र डुंबरे, लायन चंद्रहास शेट्टी, करंदीकर सुमेध, मदन गोडसे, मीनल मोरे, मीनल कामत व इतर नागरिक उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या अडीच महिन्यापासून संपूर्ण शहरात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या हाताला काही काम नव्हते. प्रशासनाने आता घरकाम करणाऱ्या महिलांना कामाची परवानगी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर घरकाम करण्यास महिलांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी घर मालकांची परवानगी मिळाल्यास स्वेच्छेने काम करता येणार आहे, असा महत्वपूर्ण आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

या आदेशात अनेक सूट देण्यात आल्या आहेत. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीकरिता लागणाऱ्या व्यक्ती, रुग्णसेवेसाठी मदतनीस, हेल्पर, घरकाम करणारी व्यक्ती, यांची मदत घेता येणार आहे. या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच असाव्यात.

या आदेशामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, दिवा प्रतिष्ठानकडून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असतो. सध्या कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना जेवण देणे, गोरगरीब नागरिकांना गावी जाण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like