Pune : शहरासह धरण परिसरात जोरदार पाऊस

Heavy rain in dam area including city

एमपीसी न्यूज – बुधवारी वादळी वाऱ्यासह पुणे शहराला झोडपून काढणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज, गुरुवारीही सकाळपासूनच शहरात मुक्काम ठोकला आहे. पुणे शहरासह धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे.

बुधवारी झालेल्या पावसामुळे पुण्यात जवळपास 100 झाडे पडली. वीज गायब झाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पुण्यातही मोठ्या प्रमाणात जाणवला. वडगावशेरी भागात पावसाचे पाणी घुसले.

जुन महिन्याची सुरुवात होताच पुण्यात रोज पावसाने धडाकाच लावला आहे. उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही झाली. आता थंडगार वातावरण निर्माण झाले आहे. आणखी 3 ते 4 दिवस पुणे शहर आणि परिसरात विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

मागील पाच दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरसह वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. शहरासह खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धारण क्षेत्रांतही जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या पुणेकरांना मुबलक पाणीसाठा असल्याने फारशी काही अडचण जाणवणार नाही.

यावर्षी पुणेकर कोरोनाच्या संकटामुळे घरातच बसून आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी होत असतात. यावर्षी मात्र पाण्याची काही फारशी समस्या जाणवली नाही. मागील वर्षी धारण क्षेत्रांत धुवादार पाऊस झाल्याने खडकवासला साखळीतील धरणे 100 टक्के भरली होती. तर, 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणी नदीतून सोडण्यात आले होते.

खडकवासलासह या चारही धरणांची एकूण क्षमता 29. 15 टीएमसी आहे. यावर्षी सुद्धा 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.