Pune : शहराच्या काही भागांत जोरदार पाऊस

Heavy rains in some parts of the city

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने आज, सोमवारी दुपारी तीन वाजता काही भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांची गैरसोय झाली.

शहरातील हडपसर, वडगावशेरी, धायरी, सिंहगड रोड, सातारा रस्ता, गुलटेकडी, आंबेगाव, या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर, औंध, बाणेर, पाषाण, सुस, म्हाळुंगे परिसरात केवळ आभाळ भरून आले होते. शिवणे – उत्तमनगर परिसरात काही वेळच पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागातील घरांत पाणीही साचले होते.

सिंहगड रस्ता परिसरात 15 ते 20 मिनि पाऊस सुरू होता. मध्यवर्ती पेठांमध्ये चांगला पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. तर, दुचाकीधारकांची तारांबळ उडाली होती.

जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला. नंतर पावसाने हुलकावणी दिली. दोन दिवसात जुलै महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. आज झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे.

धरण क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.