pune : सरकारी बाबूंना आजपासून हेल्मेटसक्ती

एमपीसी न्यूज : सरसकट हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा विरोध होऊ लागल्यानंतर या नाराजीची धार बोथट करण्यासाठी प्रथम सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना आजपासून (मंगळवार) हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सरकारी नोकरदारांनी कायद्याचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी हेल्मेटचा वापर न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांनी एकदा मोटारीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून शहरात फिरावे, मग हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, असा पुणेरी सल्ला देत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने शहरात हेल्मेट सक्ती राबविण्यास विरोध केला. आधी शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, मगच शहरात हेल्मेट सक्ती राबवा, असा टोलाही कृती समितीने लगावला आहे.

पुण्यात रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी हजारो वाहनचालकांमधून सरकारी कर्मचारी ओळखणार कसे, हा प्रश्न आता वाहतूक पोलिसांपुढे उभा राहिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.