Pune : जिम असोसिएशन, व्यायाम शाळा, आरोग्यकेंद्र धारकांना मदत करा : दीपाली धुमाळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास गेल्या दोन महिन्यापासून आपल्या राज्यातील सर्व जिम बंद आहेत. त्यामुळे जिम चालक, व्यायाम शाळा व आरोग्य केंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  त्यामुळे त्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.

संचारबंदी लागू होऊन 50 दिवसांचा जास्त कालावधी झाला आहे. दि. 17 मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या राज्यातील सर्व जिम व आरोग्य केंद्र बंद आहे. त्यामुळे या व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

व्यायाम क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सर्वच जिम व फिटनेस सेंटरच्या जागा या भाडेतत्वावर घेतल्या आहेत. जागेचे भाडे, विद्युत आकार, व्यायाम साधनांची दुरुस्ती, देखभाल खर्च, स्वच्छता, प्रशासकीय खर्च, कर्मचारी व प्रशिक्षकांचा पगार, व्यायामाचे उपकरणे घेताना काढलेल्या कर्जाचे हप्ते या सर्व गोष्टींची काळजी घेऊन हा उद्योग चालवीत होते.

या व्यवसायिकांना करमाफी, 3 महिन्यांची वीज बिल माफी, बँकेचे हप्ते भरण्याबाबत अधिकचा वेळ, जिमच्या भाड्यात सूट, अशी आर्थिक मदत करण्याची मागणी अजित पवार यांना दिलेल्या पत्रात दीपाली धुमाळ यांनी केली आहे.

जिथे ऑरेंज झोन व ग्रीन झोन आहे तेथील जिम हळूहळू सोशल डिस्टन्सच्या नियमात राहून सुरू केल्या तर नागरिकांची प्रतिकार शक्तीही वाढणार आहे. त्यामुळे या जिम असोसिएशन, व्यायाम शाळा व आरोग्य केंद्रांचा राज्य शासनाने विचार करावा, असेही म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.