Pune : हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी

एमपीसी न्यूज- पुणे शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आठवडाभरापासून राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून 3 जानेवारी रोजी अत्यंयात्रा देखील काढण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील विविध संघटनांच्या हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी पार पडला.

या दशक्रिया विधी दरम्यान हेल्मेट, दारूच्या बाटलीत चहा, वडा पाव, भेळ अशा वस्तू ठेवून हा विधी पार पडला. यावेळी हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, भाजप नेते संदीप खर्डेकर, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, काँग्रेस सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मागील आठवडाभरापासून पुणे वाहतूक पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवित हेल्मेट सक्ती केली जात आहे. ही निषेधार्थ बाब असून पुणे शहराच्या वाहतुकीचा वेग लक्षात घेता. हेल्मेट सक्ती राबविणे चुकीचे आहे. वाहतुक पोलिसांनी ही कारवाई मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.