Pune : हिरकणी, प्रज्वला योजनेतून महिलांना मिळाले प्रोत्साहन- उषा बाजपेयी

राज्य महिला आयोगातर्फे बचतगट प्रशिक्षण कार्यशाळा

एमपीसी न्यूज- “महिला बचत गटांना व सर्वसामान्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना संधी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘हिरकणी महाराष्ट्राची’ आणि ‘प्रज्वला’ या योजनांमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. मुद्रासारख्या योजनेमुळे गृहिणी आता उद्योजिका होण्याकडे वाटचाल करीत आहेत. राज्य महिला आयोगाकडून बचतगटांना अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत,” अशी माहिती राज्य महिला आयोग बचतगट विभागाच्या प्रमुख उषा बाजपेयी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित बचतगट प्रशिक्षण कार्यशाळेत वाजपेयी बोलत होत्या. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेला आमदार योगेश टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, रवी अनासपुरे, विनायक आंबेकर, मिसेस युनिव्हर्स पल्लवी कौशिक यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हिरकणी महाराष्ट्राची’ या योजनेची नुकतीच सुरुवात झाली आहे. या कार्यशाळेत जवळपास १५ हून अधिक बचतगटाच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली.

उषा बाजपेयी म्हणाल्या, “महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. त्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येऊन कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे. अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. या महिलांना उद्योजिका बनण्यासाठी शासनाच्या सर्व योजनांचे लाभ देण्यासाठी आमचा बचतगटाचा विभाग प्रयत्नशील आहे.”

योगेश टिळेकर, योगेश गोगावले व विनायक आंबेकर यांनीही महिलांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्याचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे, असे आवाहनही टिळेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.