Pune : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज- बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने शुक्रवारी (दि. 24) ही कारवाई केली.

दिनेश लक्ष्मण ढवळे (वय 22, रा सिध्देश्वर मित्र मंडळाशेजारी साईनगर हिंगणे खुर्द) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे हे स्टाफसह अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई नितीन रावळ व कैलास साळुंके यांना पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दिनेश ढवळे हा सृष्टी गार्डन समोरील रस्त्याजवळ उभा असून त्याच्याकडे पिस्तूल आहे अशी माहिती खबऱ्याकडून मिळाली.

पोलिसांनी त्वरित त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल व खिशामध्ये दोन जिवंत काडतूस असा 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करून अलंकार पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध वारजे व विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर, पोलीस नाईक विल्सन डिसोझा,पोलीस शिपाई कैलास साळुंकेयांचे पथकाने केली. पुढील तपास अलंकार पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.