Pune : लग्न जमवताना कुंडली बघण्यापेक्षा एच आय व्ही स्टेटस तपासून बघण्याची जास्त गरज – सोनाली दळवी

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने 377 कलम रद्द केलं असलं तरी त्यामुळे आमच्या आयुष्यात फार फरक पडलेला नाही. कायद्यातील तरतुदी पेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणं जास्त गरजेचे आहे. तृतीयपंथीं विषयी अनेक प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनात आहेत, एड्स सारखा असाध्य रोग फक्त तृतीयपंथी किंवा समलिंगि लोकांनाच होतो हा गैरसमज दूर होण्याची गरज आहे. आपल्या कडे लग्न जुळवताना कुंडली, देवक या गोष्टी बघण्यापेक्षा मुलामुलींचे ‘एच आय व्ही स्टेटस’ बघणे जास्त गरजेचे आहे असे मत तृतीयपंथी कार्यकर्ती सोनाली दळवी यांनी व्यक्त केले.

‘थँक्यू सोनाली’ या लघुपटामधे दळवी यांनी रक्तदात्याची भूमिका केली असून वैयक्तिक जीवनातही त्या नियमित रक्तदाता आहेत. या लघुपटाचे प्रसारण आणि त्याचबरोबर लघुपटातून दिलेल्या सामाजिक संदेशा संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ११ मिनिटांचा हा लघुपट तृतीयपंथींचे हक्क, रक्तदान आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह या विषयावर आधारित आहे. या कार्यक्रमात पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक महेंद्र वाघ, महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी, पुणे जिल्ह्याचे कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद सोनावणे, रक्तदान शिबिर आयोजिका डॉ. ज्योती शिंदे, लघुपटाचे दिग्दर्शक सचिन बिडवई आणि कलाकार राजवीर पाटील सहभागी झाले होते. या सर्वांशी लेखक / समीक्षक राज काझी यांनी संवाद साधला.

हल्ली होणाऱ्या अपघातांची संख्या आणि काही आजार यासाठी विविध रुग्णालय, रक्तपेढ्या यांच्याकडे सर्व गटातील रक्ताचा संचय असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी स्वेच्छेने केलेले रक्तदान गरजेचे असल्याचे मत जनकल्याण रक्तपेढी चे व्यवस्थापक महेंद्र वाघ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, स्वेच्छा रक्तदात्यांच्या माध्यमातून सुरक्षित रक्त रुग्णापर्यंत पोहोचवणे हे जनकल्याण रक्तपेढी चे ध्येय असून गेली ३६ वर्षे रक्तपेढी चे काम सामाजिक आणि तांत्रिक पद्धतीने यशस्वीपणे चालू आहे. आमचा प्रकल्प हा ‘सोशल टेक्निकल प्रोजेक्ट’ आहे असं म्हणता येईल कारण सामाजिक बांधिलकीच्या​ भावनेतून रक्तदान करावे यासाठी प्रवृत्त करणे तसेच समुपदेशन आणि मार्गदर्शन करून स्वेच्छा रक्तदाता तयार करणे हा सामाजिक तसेच मिळालेल्या रक्तावर प्रक्रिया करून त्याचे संवर्धन करून ते रुग्णापर्यंत पोहोचवणे या सर्व तांत्रिक बाबी आमच्या रक्तपेढी मार्फत केल्या जातात.

रक्तदान शिबिर आयोजक डॉ. ज्योती शिंदे या गेली 15 वर्ष महिलांनी रक्तदान करावे यासाठी कार्यरत आहेत. रक्तदान करण्यासाठी महिलांनी स्वतःच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन ची मात्रा योग्य प्रमाणात असेल तर त्या नियमितपणे रक्तदान करू शकतात. इतर सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या महिला रक्तदान करण्यासाठी मात्र पुढे येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली पण गेल्या 15 वर्षांच्या या प्रयत्नाला आता यश मिळत असून महिला रक्तदात्यांची संख्या 2 टक्क्यांवरून 40 टक्‍क्‍यांपर्यंत आली असल्याचं त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीचे पुणे जिल्ह्याचे कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद सोनावणे यांनी या वर्षीच्या संकल्पनेविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘नो युवर स्टेटस’ आणि ‘ समाज बदल घडवतो’ या दोन संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम जनजागृती साठी जिल्हास्तरीय राबविले जाणार आहेत. एच आय व्ही संदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती हवी असल्यास 1097 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान सोनावणे यांनी या वेळी केले.

माझ्यासमोर एका तृतीयपंथी​ व्यक्तीस मॉल मध्ये प्रवेश नाकारण्यात आला या एका घटनेवरून मला या लघुपटासाठी विषय सुचल्याचे युवा दिग्दर्शक सचिन बिडवई याने सांगितले. तो म्हणाला, समाजामध्ये अनेक स्तरांवर तृतीयपंथीयांना विविध कारणासाठी नाकारले जाते अगदी रक्तदाना सारख्या पवित्र आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश दिला जात नाही ही वस्तुस्थिती या लघुपटातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.

थँक्यु सोनाली या लघुपटात एचआयव्ही ची लागण झालेल्या युवकाची भूमिका केलेल्या राजवीर पाटील याने सध्याची तरुण पिढी चांगले दिसण्यासाठी, शरीरस्वास्थासाठी आणि सकस सेंद्रीय आहाराविषयी जेवढी जागरूक आहे तेवढी सुरक्षित लैंगिक संबंधाविषयी जागरूक नसून याविषयी मुक्तपणे चर्चा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.