Pune: सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून सर्वसाधारण सभा घ्या, दीपाली धुमाळ यांची मागणी

Pune: Hold a general meeting following the rules of social distance, demanded Leader of the Opposition Deepali Dhumal

एमपीसी न्यूज- सोशल डिस्टनसिंगचा नियम पळून पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे साडे सहा हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. जवळपास 4 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने घरी गेले आहेत. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाचे काम प्रशंसनीय आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मागील 2 महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे तहकूब करण्यात आली होती. मुख्य सभा स्थगित केल्याने नागरिकांना आणि नगरसेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नगरसेवकांच्या प्रभागांतील अनेक आवश्यक असलेली पावसाळी कामे पूर्णपणे थांबलेली आहेत. मागील वर्षी 25 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे पुणेकरांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले होते. काही नागरिकांचे जीवही गेले होते.

या नागरिकांना होणाऱ्या अडचणींचे विषय सुद्धा मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना संदर्भात उपाययोजना आणि सद्यस्थितीची चर्चा होणे आवश्यक आहे.

त्यासाठी सोशल डिस्टनसिंगचा नियम पळून सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.

त्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. पावसाळा आता तोंडावर आला आहे. अवकाळी पाऊस कधी आणि किती होणार, याची काहीही शाश्वती नाही. त्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणे गरजेचे असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.