Pune : विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, निधीची ठोस तरतूद नाही -माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज – अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणा असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, अशी टीका भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

पुणे मेट्रोसाठी केलेली तरतूद तुटपुंजी आहे. पुण्यातील रिंगरोडसाठी केंद्र सरकारच्या भरवशावर निधी दिला जाणार आहे, विमानतळासाठी पुरेशी तरतूद नाही, महिला आणि समाज कल्याणसाठी निधी अपुरा आहे. शिष्यवृत्ती वाटपासाठीच तो कमी पडेल, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या मुख्यमंत्री सहायता योजनेचा साधा उल्लेखही नाही. एचसीएमटीआर, नदीकाठ सुधारणा, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदी पुणे शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद केलेली नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर एक रुपया अतिरिक्त कर लावल्याने महागाई वाढणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यात आली आहे. आमदारंचा विकासकामांसाठी निधी २ कोटीवरून ३ कोटी रुपयांपर्यंत वाढविला आहे. मात्र, शहरी भागातील आमदारांना दरवर्षी मिळणार्‍या पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीला कात्री लावली आहे.

हा अर्थसंकल्प गेली पाच वर्षे सुरू असलेल्या विकासकामांना, योजनांना खीळ घालणारा आणि समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांची घोर निराशा करणारा आहे, असेही मिसाळ म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.