Pune : दहशतवादी हल्ल्यामधील शहीद सैनिकांसाठी एमसीई सोसायटीमध्ये सर्वधर्मीय श्रध्दांजली सभा

बिशप थॉमस डाबरे, अमरजितसिंह ,मुफ्ती काझमी यांच्यासह धर्मगुरूंचा सहभाग

एमपीसी न्यूज- काश्मीरमधील सैन्यदलावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आज, शनिवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता ही श्रद्धांजली सभा आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे झाली. पुणे प्रांताचे बिशप थॉमस डाबरे, शीख धर्मगुरू अमरजितसिंह ,मौलाना मुफ्ती काझमी यांच्यासह धर्मगुरूंचा सहभाग या सभेत होता .

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आबेदा इनामदार, लतीफ मगदूम,मनजीतसिंह वीरदी, संस्थेचे पदाधिकारी, दहा हजार विद्यार्थी, प्राध्यापक, सेवकवर्ग आदी उपस्थित होते.

फादर बिशप डाबरे यांनी शहीदांप्रती प्रार्थना केली. ‘आम्ही जगावे, यासाठी त्यांनी त्याग केला, शहीद झाले,त्यांना शांती मिळो.जवानांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पेलण्याची शक्ति मिळो. हल्ला करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो ‘ असे ते म्हणाले.

शीख धर्मगुरू अमरजीतसिंह म्हणाले ‘ शहीद वीर सुपुत्रांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली पाहिजे. हल्लेखोरांना शिक्षा झाली पाहिजे’

मौलाना मुफ्ती काझमी यांनी सर्वांच्या वतीने शहीदांसाठी दुआ मागितली. दहशतवाद्यांचा निषेध केला.गंगा -जमनी तहजीब कायम राहावी, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.