Pune : एम.सी.ई.सोसायटीच्या अभिवादन मिरवणुकीत 10 हजार सर्वधर्मीय विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज, रविवारी सकाळी साडेआठ वाजता अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे हे 15 वे वर्ष होते.

मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले .संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. संस्थेतील 30 आस्थापनातील 10 हजार अल्पसंख्यक, सर्वधर्मीय विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले. दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल – ताशा यांचा मिरवणुकीत समावेश होता.राखीव जागांच्या संदर्भात महात्मा गांधी -डॉ आंबेडकर यांच्यातील ‘पुणे करार’ हा जिवंत देखावा या अभिवादन मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

आझम कॅम्पस येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन पुना कॉलेज, गोल्डन ज्युबिली, जुना मोटार स्टँड, पदमजी पोलीस चौकी, भारत सिनेमा, ए. डी. कॅम्प चौक, मॉडर्न बेकरी चौक, संत नरपतगिरी चौक, वीज वितरण कार्यालय, जिल्हा परिषद मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ.आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता झाली.

‘अवामी महाज’या सामाजिक संघटनेतर्फे या ठिकाणी मोफत पाणपोई आणि सरबत वाटप केंद्र व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. त्यातून महामानवांचे सामाजिक, शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.