Pune : साहित्याच्या सुवर्णपिंपळाखाली गोविंदाग्रजांना पुणेकरांची मानवंदना

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज- आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मराठी भाषेची सेवा करणारे… गोविंदाग्रज, बाळकराम आणि राम गणेश गडकरी या तिन्ही वेगवेगळ्या नावांनी काव्य, विनोदी साहित्य व नाटक लिहिणा-या थोर साहित्यिकाला पुणेकरांनी आदरांजली अर्पण केली. कसबा पेठेतील घर क्र. १३६ च्या समोर असलेल्या ज्या पिंपळाच्या झाडाकडे पाहून ते लेखन करीत असत, त्या झाडाच्या पाराजवळ पुण्यातील नाटयसंगीत, शाहिरी आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी जमली. त्यांनी गोविंदाग्रजांना आपल्या शब्दसुमनांनी अनोखी मानवंदना दिली.

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी या महान साहित्यिकाला शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त मानवंदना देण्यासाठी कसबा पेठेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदाग्रजांच्या साहित्यसेवेच्या पिंपळवृक्षाच्या जिवंत साक्षीदारासमोर त्यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. याप्रसंगी ’महाराष्ट्र देशा’या गीताचे गायन शाहीर मावळे यांनी केले. पिंपळवृक्ष आणि आजूबाजूचा परिसर फुलांच्या माळा व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.

द. मा. मिरासदार म्हणाले, “राम गणेश गडकरी हे प्रतिभावान लेखक होते. दुर्देवाने त्यांना फार आयुष्य मिळाले नाही. नाटक, काव्य आणि विनोदी लेखन करणारे ते थोर साहित्यिक होते. जर त्यांना आणखी आयुष्य मिळाले असते, तर त्यांच्याकडून फार मोठे कर्तृत्व घडले असते. एकच प्याला सारखे त्यांनी लिहिलेला नाटयविष्यकार त्यांच्या निधनानंतर रंगभूमीवर आला, त्यामुळे त्यांना ते नाटक पहायला मिळाले नाही”

चारुदत्त आफळे म्हणाले, “गडकरी यांच्यामध्ये विनोद करताना देखील गंभीरपणाची आठवण येते. एकच प्याला या नाटकातून दारु प्यायलाने सर्वनाश होतो, हा एकमेव संदेश द्यायचा होता. मात्र, त्यांनी विनोदातून या गोष्टी रसिकांसमोर मांडल्या”असे त्यांनी सांगितले. आफळे यांनी नाचत ना गगनात नाथा… या काव्याचे यावेळी सादरीकरण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.