pune : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या वाढविण्यासह घरोघरी सर्वेक्षण गरजेचे : अजोय मेहता

Home Surveys Needed to Increase Tests to Prevent Corona Infection: Ajoy Mehta :सामाजिक कार्यकर्ते तसेच सोसायटीचे अध्यक्ष यांचाही सहभाग घ्या

एमपीसी न्यूज – कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्व्हेक्षण तसेच कोरोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी दिल्या.

कोरोना चाचणीसाठी स्त्राव नमुना घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी विलंब होणार नाही, याची दक्षता घ्या तसेच घरोघरी जावून करण्यात येत असलेले सर्वेक्षण वाढविण्यासोबतच यामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच सोसायटीचे अध्यक्ष यांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना करून झोपडपट्टी क्षेत्रातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही मेहता यांनी दिल्या.

पुणे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

कोरोना वाढीचा दर, बरे होण्याचा दर, मृत्यू दर याचा अंदाज घेत जुलैअखेर अपेक्षित असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यादृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठीचे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

ज्या गावात कोरोना रुग्ण आढळत आहे, त्या संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून शहरानजीकच्या गावातील वाढता संसर्ग विचारात घेत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.